सुस्वागतम!.. सुस्वागतम!!.. सुस्वागतम!!!...मी श्री.विलास काकुळते पाटील ब्लाॅग मध्ये आपले स्वागत करतो.
!!घराबाहेर जाणे टाळा-कोरोणाला बसेल आळा.!!

29/05/2020

*ABPमाझा शिक्षण परिषद -2*  
            *ठळक मुद्दे*
=======================
🟣 जून महिन्यात शाळा सुरु करू नये *- शैलजा मुळे*

🟣 शिक्षणाच स्वरूप सर्वांनी मिळून ठरवावे , शाळा , शिक्षकांवर विश्वास ठेऊन बघितला पाहिजे
*- मनोज सिसोदिया , शिक्षणमंत्री , दिल्ली सरकार*

🟣 शिक्षणात सर्वच गोष्टी शिकवता येत नाही , मुलांना शिक्षकांकडून मार्गदर्शन मिळण आवश्यक आहे 
*- वसंत काळपांडे , शिक्षण तज्ञ*

🟣 जून महिन्यात शाळा सुरू केली आणि दुर्दैवाने विषाणू संसर्ग शाळेत झाला तर याची जबाबदारी कोण घेणार?
*- अनिल पाटील सर (रयत शिक्षण संस्था)*

 🟣 शिक्षक आणि विद्यार्थी यांचा जगण्याचा प्रश्न जास्त महत्वाचा त्यांची सुरक्षितता सर्वात महत्वाची आहे ऑनलाईन शिक्षण देताना , फिजिकल शिक्षण देताना अडचणी येणार आहेत , शाळा सुरू करतांना सर्व सक्षम पर्याय तपासून पाहिले जातील , १० वी १२ वी चे निकाल जून अखेर लावण्यात येईल. १५ जूनच्या आधी क्रमिक पुस्तके मिळणार ,काही जिल्ह्यात , तालुक्यात कोरोनाचा एकही पेशंट नाही , पण कोण कोठून कसा येईल ,ते सांगता येणार नाही , म्हणून खबरदारी सर्वच ठिकाणी घ्यावी लागेल ,शालेय पोषण आहार संबंधी इतरही पर्याय तपासून पाहिले जातील , आपल्याकडे १लाख ६४ हजार तंत्रस्नेही शिक्षक आहेत , त्यांचीही मदत घेतली जाईल , शिक्षणात अभ्यासक्रमात भविष्यात नवीन बदल करावे लागणार , आश्रमशाळा , अंधशाळा विषयी वेगळे नियोजन करावे लागणार ,खाजगी शाळांनी अवास्तव फी (योग्य असेल तेव्हढे घ्या)किवा ऑनलाईनच्या नावाखाली पैसा पालकांकडून घेतल्यास कारवाई करणार
*- मा. मंत्री महोदय श्री. बच्चू कडू*

🟣 ऑनलाईन शिक्षण हा शिक्षकाला पर्याय नाही , ती तात्पुरती व्यवस्था आहे , ग्रामीण भागातील शिक्षणाचा अधिक विचार करावा *-अजयकुमार साळुंखे , स्वामी विवेकानंद संस्था*

🟣 ग्रामीण भागातील फक्त 30 ते 35 % पालकांकडे फोन किंवा इंटरनेट सुविधा आहे , त्यांच्यापुढे पोटापाण्याचा प्रश्न सध्या जास्त महत्वाचा आहे , बऱ्याचशा शाळा ह्या क्वारंटाईन सेंटर म्हणून वापरल्या जात आहेत ,आपल्या मुलांना शाळेत पाठविताना त्यांच्या सुरक्षितत्याबाबत ते साशंक आहेत,
 *-संदीप पवार (जि.प.प्राथमिक शिक्षक)*

🟣 शिक्षण हा मुलाला मिळणारा अध्ययन असतो तो त्यांना मिळायला हवा , म्हणून प्राथमिक , माध्यमिक असा फरक करता येणार नाही , ऑनलाईन शिक्षण कसे द्यावे याबाबत शिक्षकांना प्रशिक्षण द्यावे 
*- रणजितसिंह डिसले ( तंत्रस्नेही प्राथमिक शिक्षक)*

🟣 ऑनलाईन शिक्षणापेक्षा मला फिजिकल शिक्षण आवडले - *दिशा , विद्यार्थिनी*

27/05/2020

एक सांगू!! बहीरे व्हा, यशस्वी व्हा!

दोन बेडुक होते, खेळता खेळता दोघेही एका कोरड्या विहीरीत पडले. ती विहीर बर्‍यापैकी खोल होती. दोघेही वर येण्याचे खुप प्रयत्न करु लागले.
           बघता बघता इतर सार्‍या बेडकांचा गोतावळा विहीरीच्या काठावर गोळा झाला. विहीरीतले बेडुक थोडं वर चढायचे, आणि लगेच खाली पडायचे, त्यांना जागोजागी खरचटायला लागलं.
            वरुन त्यांच्या शुभचिंतकांनी त्यांना सल्ले देण्यास सुरुवात केली. कशाला धडपड करताय? ह्या विहीरीतुन तुम्ही कधीही वर येऊ शकणार नाही. आता आहात तसेच रहा. एवढं अंतर चढुन वर येणं, तुम्हाला कधीही शक्य होणार नाही. तेव्हा रक्तबंबाळ होण्यात काहीच अर्थ नाही, बाहेर येण्यास धडपडु नका.
                    दोघांपैकी एका बेडकाने तो सल्ला ऐकला, आणि तळाशी जाऊन तो स्वस्थ बसला. त्यालाही वाटलं की आता इथुन बाहेर पडणं अशक्य आहे.

दुसऱ्या बेडकाने मात्र प्रयत्न करणं चालु ठेवलं, तो उड्या मारत राहीला, वरुन जसजसा गोंगाट वाढला, तसतसे त्याचे प्रयत्नही वाढत राहीले.
               त्याचा हुरुप वाढत राहीला, आणि बघता बघता तो काठावर पोहचला सुद्धा. आता सर्व बेड्कांना त्याच्या धैर्याचं खुप खुप आश्चर्य वाटलं.

त्यांनी विचारलं, आम्ही नको नको म्हणत असताना तु वर कसा काय चढु शकलास? तेव्हा त्यांना कळालं की तो चक्क बहीरा होता. त्याला काहीच ऐकु येत नव्हतं.
         
उलट त्याला वाटत होतं, की हे सर्व त्याला ओरडून ओरडून प्रोत्साहन देत आहेत. आणि म्हणुनच तो वर चढण्याचं धाडस करु शकला होता.

*आपल्याही आयुष्यात कधी कधी असं बहीरं होणं आवश्यक असतं. इतिहासात डोकावुन पाहीलं तर हेच दिसेल, की अकल्पनीयरित्या विलक्षण यशस्वी झालेले लोक बहीरे होते किंवा आजुबाजुला नकारात्मक गोंगाट करणार्‍या गोष्टींसमोर त्यांनी ठार बहीरे असल्याचं सोंग घेतलं होतं.*

अमेरीकेत नॉर्थ केरोलिना शहरात राहणार्‍या, एका गरीब कुटुंबात दोन भाऊ राहत होते. लहानपणापासुनच त्यांना कुतुहल होते, जर हवेत पतंग उडु शकतो, पक्षी हवेत उडु शकतात, तर हवेत तरंगणारं एखादं यंत्र तयार करुन, त्यात बसुन, माणुस हवेत का उडु शकणार नाही?
                 ह्या कल्पनेने ते भारावले होते. ओरोविल आणि विल्बर राईट ही त्यांची नावे. त्यांचं एक गॅरेज होतं, वर्षातुन सहा महीने त्यात ते सायकली रिपेअर करायचे, पंचर काढायची, पैसे जमवायचे आणि उरलेले सहा महीने हवेत उडणार्‍या ग्लायडरचे प्रयोग करण्यात वेळ आणि पैसे खर्च करायचे.

सगळं जग त्यांच्यावर हसायचं. दोघांपैकी एकाकडेही साधा डिप्लोमा देखील नव्हता, हे दोघे सायंटिस्ट असल्याच्या अविर्भावात वावरतात म्हणुन लोक त्यांच्या प्रयोगांवर, त्यांच्या उड्डाणांवर फिदीफीदी हसत.
          त्यांची टिंगल करीत, लोकांच्या उपहासासमोर आणि टीकेसमोर राईट बंधु बहीरे झाले, आणि त्यांनी काम सुरुच ठेवलं. थोडीथोडकी नव्हे, तब्बल सोळा वर्ष अविरत प्रयोग केले, अनेक आकृत्या काढल्या, अनेक सुत्रं मांडली आणि एके दिवशी नियती त्यांच्यासमोर झुकली आणि विमान हवेत उडाले. राईट बंधु इतिहासात अमर झाले.

राजीव भाटीया उर्फ अक्षय कुमार हा आजच्या काळातला सुपरहीट हिरो. नव्वदीच्या दशकामध्ये त्याचा बॅड पॅच चालु होता. त्या दोन-तीन वर्षातले त्याचे बहुतांश चित्रपट लागोपाठ फ्लॉप होत होते.
                     
तेव्हा एका पत्रकाराने त्याला कुत्सितपणे विचारलं, तुझे ओळीने तेरा चित्रपट फ्लॉप झालेत, याबद्दल काय सांगशील? अक्षय हसुन म्हणाला, तु सांगतोयस ते खरे नाही, माझे तेरा नाही तर सोळा पिक्चर ओळीने फ्लॉप झाले आहेत.
                 पण त्यामधुन मी शिकेन आणि अजुन जोमाने काम करेन, जगाने केलेल्या टिकेसमोर अक्षयकुमार बहीरा झाला आणि म्हणुन पंचवीस वर्षापुर्वी पाच हजार रुपयांवर काम करणारा माणुस आज फक्त नऊशे त्र्याहत्तर करोड रुपयांचा मालक आहे.

ब्रायन एक्टन नावाचा माणुस जेव्हा फेसबुक कंपनीत इंटर्व्ह्यु द्यायला गेला तेव्हा नौकरी करण्यास तो योग्य नाही असं सांगुन त्याला नाकारलं गेलं.
             इतकचं काय ट्विटर कंपनीमध्येही त्याला काम मिळालं नाही, जगाच्या नकारासमोर, निराश न होता, त्यानंही बहीर्‍याचं सोंग घेतलं, आणि आपल्या काही मित्रांना घेऊन वॉटसएप कंपनी सुरु केली.
               तीच वॉट्सएप कंपनी, फेसबुकने एकवीस बिलीयन डॉलर्स म्हणजे तब्बल एक लाख एकोणचाळीस हजार करोड रुपयांना विकत घेतली. अपयशासमोर बहीरा झाल्याचा ब्रायन एक्टनला असा फायदा झाला.


स्टीव्ह जॉब्जला, त्याच्या उद्धट वर्तनाबद्दल, त्यानेच बनवलेल्या एप्पल कंपनीतुन अपमानित करुन, काढुन टाकलं गेलं. सिलीकॉन व्हॅलीत, जिकडे तिकडे त्याच्या अपयशाच्या चर्चा होत्या.
          इतकं की त्याचं बाहेर पडणं, लोकांत मिसळणंही अवघड झालं होतं. स्टीव्ह जॉब्ज बहीरा झाला. त्यानं नेक्स्ट आणि पिक्सार अशा दोन कंपन्या काढल्या, स्वतःच्या चुका सुधारल्या, नेक्स्टला एप्पलने खरेदी केलं आणि जगाला आयफोन, आयपॅड मिळाले. स्टीव्ह जॉब्ज इतिहासात अजरामर झाला.
         
थॉमस अल्वा एडीसन लहान असताना त्याच्या शिक्षकांनी त्याला मंदबुद्धी ठरवुन, त्याचं नाव शाळेतुन काढुन टाकलं होतं. त्याच्या आईने, शिक्षकांच्या सांगण्यापुढे, बहीरं व्हायचं ठरवलं.
              तिने एडीसनला प्राथमिक शिक्षणाचे धडे दिले. ह्याच एडीसनने पुढे चमत्कार घडवले. त्याने शेकडो शोध लावले. विजेचा बल्ब हा त्याचा सर्वात क्रांतिकारी शोध.
              त्यासाठी त्याने दहा हजार प्रयोग केले. सगळं जग त्याला हे होवु शकणार नाही असं सांगत असताना, तो ठार बहीरा झाला. त्याने दुर्दम्य इच्छाशक्ती जागृत ठेवली आणि एके दिवशी देवाला त्याची दया आली. बल्ब प्रकाशला. एडीसन जिंकला, पुन्हा एकदा जग हरलं.

साडेतीनशे वर्षापुर्वी जेव्हा सगळीकडे मुघलशाही, आदिलशाही, निजामशाही राज्य करत होती, तेव्हा स्वराज्य स्थापन करणं शक्य आहे असं कोणाला स्वप्नातही वाटत नव्ह्तं.
               सगळे शुरवीर सरदारही गुलामगिरी करण्याखेरीज पर्याय नाही असंच मानत होते, पण शिवाजी महाराजांनी ह्या परिस्थीतीला आव्हान दिलं, आणि इतिहास घडवला.
               

आपल्याला रोखणारे जसे बाहेर काही आवाज असतात तसेच आपल्या आतमध्येही काही शत्रु राहत असतात. हा आतला गोंगाटच जास्त धोकादायक असतो.
                   माणसाच्या मनात त्याला सतविणार्‍या चिंतापैकी सत्यान्नव टक्के चिंता ह्या फक्त कल्पनेतच रुंजी घालतात, त्या कधीच प्रत्यक्षात येत नाहीत. मनाने उत्पन्न केलेली भीति, आणि त्या भितीचा बागुलबुवा हाच आपला सर्वात मोठा शत्रु आहे.
        त्याला जिंकण्यासाठीही त्याच्यापुढे बहीरे असल्याचं सोंग घ्यावं लागतं. त्याच्याकडे दुर्लक्ष केलं की यशाचे सारे मार्ग सुकर होतात.


*श्रीमदभगवतगीतेमध्ये ही भगवान श्रीकृष्ण सांगतात की, उद्धरेत आत्मना आत्मानं!.. तुच स्वतः, तुझा खरा मित्र आहेस आणि तुच स्वतः, तुझा शत्रु आहेस. ह्या आतल्या गोंगाटावर जे विजय मिळवतात, तेच खरे यशस्वी होतात, म्हणुन म्हणतो, बहीरे व्हा!, यशस्वी व्हा!….

26/05/2020

ड्युटी


*जीव वाचला नाही तरी चालेल पण नोकरी टिकली पाहिजे... किती ही लाचारी....*

 .... भरपूर सुट्ट्या  आणि भरघोस पगार म्हणून       हिणवणाऱ्या शिक्षकांना खरंच कोणी वाली नाही....
 .... आज करोना च्या संकटात सगळे आपला जीव मुठीत घेऊन आपापल्या घरट्यात सुखरूप बसले आहेत.... पण शिक्षक मात्र खूप सुट्ट्या खातो... पगार खातो..... त्यामुळे त्याला अमरत्व प्राप्त झालेले आहे.... तो मात्र जातो लोकांच्या दारात सर्वेक्षण करायला.... त्याला मुलं बाळ नसतात... त्याला काही आजार नसतात आणि मुख्य म्हणजे तो शिक्षक असल्यामुळे सर्वज्ञ असतो.... त्याला ते काम करण्यासाठी कोणत्याच प्रशिक्षणाची गरज नसते..... आपल्या आजूबाजूला कोविड-१९ चा एखादा रुग्ण मिळाला तरी सामान्य माणसाच्या घशाला कोरड पडते..... लोकांना कल्पनाही नसेल पण अशाच रुग्ण मिळालेल्या वस्तीत  शिक्षकांना सर्वेक्षणासाठी पाठवलं जातं..... बरं काही विशेष सोई... तर अजिबात नाही.... मागितले तर मास्क आणि ग्लोव्हज मिळतात.... नाहीतर ते ही घ्या म्हणून कोणी सांगत नाही.... बरं तिकडचे वैद्यकीय अधिकारी अशा शब्दात बोलतात की शिक्षक रस्त्यावरचे रिकामटे आहेत... आणि हे त्यांना कामाला लावत आहेत.... त्यांचे वय, त्यांचा शाळेतील सेवेचा अनुभव, त्यांचे विषयाचे ज्ञान या सर्व बाबी तेथे शुल्लक ठरतात... शिक्षकाला गरीब का म्हणतात याचा प्रत्यय येथे पदोपदी येतो....कधी संपणार ही फरफट देवाला माहित.... आपत्कालीन परिस्थितीत सरकारच्या आदेशांचे पालन करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे.... पण  केवळ शिक्षक हाच समाजाचा एकमेव घटक आहे का..... समाजातील इतर घटक हे केवळ सोई सुविधांचा लाभ घेण्यासाठीच आहेत का..... बरं डॉक्टरांनी केलेल्या कार्याचा गौरव होतो.... पोलिसांची काळजी केली जाते पण शिक्षकांना मात्र उपहासच मिळतो असं का....देश सेवा केवळ सीमेवर लढूनच केली जाते असं नाही... ऑर्डर आली की धावणारा प्रत्येक शिक्षक देशाची सेवा करत असतो.... त्याचा मानसन्मान नका करू, गौरव नका करू, पण किमान उपहास तरी करू नका..... घरी बसून फुकट पगार घेतात असं तरी नका म्हणू.... त्या सेवकांचा मान ठेवा....  ते काही आरोग्य कर्मचारी नाहीत तो त्यांचा पेशा नाही ती त्यांची आवड नाही.....जीव मुठीत घेऊन ड्युटी करणं म्हणजे काय हे त्यांच्या पेक्षाअधिक चांगलं कोण सांगेल....

24/05/2020

एक ग्लास पाणी.

          सरकारी कार्यालयात लांबच लांब रांग लागलेली होती. खिडकी वर जो क्लार्क बसला होता, तो रागीट स्वभावानं सतत डाफरत होता आणि सर्वांशी रागावून मोठ्या आवाजात बोलत होता...

त्या वेळेसही एका महिलेला रागावत म्हणत होता, "तुम्हाला थोडंही समजत नाही, हा फाॅर्म भरुन आणला आहे, यात सर्वच चुकले आहे. सरकारने फॉर्म फुकट दिला आहे तर काहीही भरावं का? खिशातून पैसे द्यावे लागले असते तर दहा लोकांना विचारून भरला असता तुम्ही."

एक व्यक्ति रांगेत उभा राहून बऱ्याच वेळेपासून हे पहात होता. तो रांगेतून बाहेर पडून, आॅफिसच्या मागच्या रस्त्याने त्या क्लार्क जवळ जाऊन उभा राहिला आणि तेथे ठेवलेल्या घागरीतून पाण्याचा एक ग्लास भरून त्या क्लार्क समोर धरला.
क्लार्क ने त्या व्यक्ति कडे डोळे वटारून पाहिले 
 मान वेळावून 'काय आहे' चा इशारा केला.
त्या व्यक्तीने क्लार्क ला म्हटले, "साहेब, खूप वेळेपासून तुम्ही बोलत आहात, घसा कोरडा झाला असेल, पाणी पिउन घ्या."
क्लार्क ने पाण्याचा ग्लास हातात घेतला आणि त्याच्याकडे असे बघितले जसे काही दूसऱ्या ग्रहावरचा प्राणी पाहीला आहे.

आणि म्हणाला, "माहीत आहे, मी कटु सत्य बोलतो, म्हणून सर्व माझ्यावर नाराज असतात. शिपाई पण मला पाणी पाजत नाही."
तो व्यक्ति हसला आणि परत रांगेत आपल्या जागेवर जाऊन उभा राहिला.

आता त्या क्लार्क चे वागणे बदलले होते. अगदी शांत मनाने तो सर्वांचे ऐकून घेत व्यवस्थीत बोलत होता आणि सर्वांचे काम त्याने व्यवस्थीत पार पाडले.
सायंकाळी त्या व्यक्ति ला एक फोन आला. दूसऱ्या बाजूला तोच क्लार्क होता.

 तो म्हणाला, "भाऊ, तुमचा नंबर तुमच्या फॉर्म मधून घेतला होता, आभार मानायला फोन केला होता.
माझी आई आणि बायकोचे अजिबात जमत नाही. आज ही जेव्हा मी घरी पोहोचलो तर दोघींमध्ये वाद सुरू होता, परंतु तुमचा गुरुमन्त्र कामी आला.
तो व्यक्ति एकदम स्तिमित झाला, आणि म्हणाला, "काय? गुरुमंत्र?"

"हो, मी एक ग्लास पाणी माझ्या आईला दिले आणि दूसरा ग्लास बायको ला, आणि म्हटले की घसा कोरडा पडला असेल, पाणी पिऊन घ्या. बस, तेव्हापासून त्या शांत झाल्या आणि आम्ही तिघे हसत-खेळत गप्पा मारत बसलो आहोत. भाऊ, आज जेवायला आमच्या घरी या."

"हो! पण, जेवायला का?"

क्लार्क ने गदगदल्या स्वरात उत्तर दिले, "गुरू मानले आहे तर एवढी दक्षिणा तर बनतेच ना आपली, आणि हे पण माहित करायचे होते की, एक ग्लास पाण्यात इतकी जादू आहे तर जेवणात किती असेल?"

दूसऱ्यांच्या रागाला प्रेमानेच दूर केले जाउ शकते. कधी कधी आपल्या एका लहानशा प्रेमळ वागणुकीने दुसऱ्या मनुष्यात खुप मोठा बदल घडून येतो आणि प्रेमाने ओथंबलेले नाते एकदम सुरु होऊ लागते, ज्यामुळे घर आणि कार्यालयात ही मनाला शांती मिळते.

23/05/2020

पश्चात्ताप


एक छोटसं गाव होतं...... आणि त्या गावांमध्ये अगदी घट्ट मैत्री असलेली दोन मुले होती राजू आणि संजू ...वय वर्ष प्रत्येकी दोन... सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत दोघेही अगदी बरोबर असायचे .राजूला संजू शिवाय आणि संजूला राजू शिवाय अजिबात म्हणजे अजिबात करमायचे नाही. खेळणे ,भांडणे, मारामार्‍या आणि रुसवे-फुगवे सगळीच गंमत असायची .
       संजू चा भला मोठा बंगला तर त्याच्या शेजारीच राजूचे  ऐसपैस घर.  दोन्हीही घरात चांगला घरोबा होता .नवीन काही पदार्थ केला तर दोन्ही घरांमध्ये तो जात येत असे. राजू व संजूची आई  सुद्धा एकमेकींच्या छान मैत्रिणी होत्या. 
         दिवसांमागून दिवस जात होते.... राजू व संजू आता मोठे होत होते. आता दोघांनाही शाळेत घालण्याची वेळ आली. संजू च्या बाबांनी ठरवले....जर संजूचे भविष्य उज्ज्वल व्हायचे असेल तर त्याचे नाव शहरातल्या एखाद्या मोठ्या शाळेमध्ये घातले पाहिजे आणि त्याप्रमाणे संजू च्या बाबांनी संजू चे नाव खूप मोठ्या शाळेमध्ये खूप पैसे भरून घातले. तर राजूच्या बाबांनी राजू चे नाव गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये दाखल केले. संजू आता रोज स्कूल बसने दिमाखदार गणवेशात शाळेत जाऊ लागला.... तर राजू सुद्धा स्वच्छ व नीटनेटक्या  नव्याकोऱ्या गणवेशात शाळेत जाऊ लागला.  दोघांनाही आता पहिल्यासारखे भेटायला मिळत नव्हते म्हणून वाईट वाटे. परंतु आपापल्या शाळेत  त्यांना नवनवीन सवंगडी मिळाल्यामुळे आता दोघांच्या दोन वाटा वेगवेगळ्या देशांना जावू लागल्या. 
        मोठ्या शाळेत श्रीमंत मुलांच्या संगतीत असल्यामुळे संजूला सुद्धा आता राजू चा विसर पडला. आपल्या शाळेच्या तुलनेत जिल्हा परिषदेच्या शाळेच्या बाबतीत त्याच्या मनामध्ये तुच्छ भावना तयार झाली होती. 
         वर्षांमागून वर्षे गेली.... दोघेही खूप हुशार होते. आपापल्या वर्गांमध्ये दोघांचे नंबर असत. बारावीची परीक्षा झाली तसे संजूने  इंजिनिअरिंग कॉलेज ला ऍडमिशन घेतले. परंतु राजूला मात्र गावाचा शेतीचा खूप लळा  असल्यामुळे त्याने एग्रीकल्चर कॉलेजला ऍडमिशन घेतले. आता दोघेही दोन वाटांवरून आपापल्या दिशेने खूप पुढे निघून गेले होते. संजूला शहरामध्ये खूप मोठ्या कंपनीत खूप मोठ्या पगाराची नोकरी लागली तर राजूने आपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या गावातील शेतीसाठी व लोकांसाठी करायचा असे ठरवले. 
        आता राजू व त्याचे मित्र फावल्या वेळेत एकत्र येऊन गावाच्या विकासासाठी नवनवीन योजना तयार करून त्या अमलात आणू लागले. गावातील रस्ते, वीज, पाणी पुरवठा अशा सर्वच महत्त्वाच्या गोष्टीं  मध्ये त्यांनी सुधारणा करण्यास सुरुवात केली. एके दिवशी गावातील पारावर बसलेले असताना आपण ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलो त्या शाळेचे ऋण आपल्यावर आहे आणि त्यासाठी सुद्धा आपण काहीतरी केले पाहिजे असे सर्वानुमते ठरले... व लगेचच शाळेतील हेडमास्तरांची भेट घेऊन शाळेसाठी कोण कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत याची यादी तयार झाली. शाळेचे रंगकाम, किरकोळ दुरुस्ती व कंपाउंड टेबल-खुर्च्या ,मुलांना बसण्यासाठी बाके इत्यादी गोष्टींची पूर्तता करण्यात आली.  आणि कोणत्याही शहरातील शाळेच्या तोडीस-तोड शाळा दिसू लागली उत्साही व मेहनती शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या बाबतीत कधीच तडजोड केली नव्हती , म्हणून त्याच्या मित्रांसारखी सुजान पिढी या शाळेमधून घडू लागली.
           तिकडे संजू खूप मोठा अधिकारी झाला. क्लब, विकेंड, मित्र-मैत्रिणी, देश-परदेशातील सहली, पार्ट्या अशी हाय सोसायटीतील राहणी त्याच्या अंगवळणी पडली. गावाचा त्याला केव्हाच विसर पडला होता.
          आणि...... अशातच न भूतो न भविष्यती असा कोरोना नामक साथरोग चीनमध्ये आला... आणि थोड्याच दिवसात त्याने सर्व जगामध्ये हात-पाय पसरायला सुरुवात केली. परदेशवारी 
  करणाऱ्या लोकांच्या कृपेमुळे तो भारतात सुद्धा येऊन पोहोचला. यावर कोणताही उपाय नसल्यामुळे अचानकच लॉक डाऊन ची घोषणा झाली... व सर्व शहरी बाबू आपापल्या घरांमध्ये अडकून पडले.लाॅक डाऊनचा काळ वाढतच गेला. तसतशी सर्वांची विचार प्रणाली जागृत होऊ लागली. आणि ज्या गावाकडे.... शहरातल्या लोकांनी कायमचीच पाठ फिरवली होती तो गाव आता सर्व चाकरमान्यांना खुणावू लागला. शहरातल्या सुख-सुविधा सोडून गावाकडे वळून पाहण्याची तसदी सुद्धा न घेतलेल्या लोकांना गड्या आपला गाव बरा असे वाटू लागले. 
        शहरात चाळीस दिवस बंदीवासात घालवल्यानंतर सरकारने सर्व लोकांना आपापल्या गावी जाण्यासाठी परवाने द्यायला सुरुवात केली. गावातील लोकांनीही मोठ्या मनाने त्यांना गावात घेण्याची तयारी दर्शवली पण.......... कोरोनाचे संकट तर तसेच होते ना  ?  आणि यावर तोडगा निघाला.... आणि धावून आली ती जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा...... 
       संजूने ज्या शाळेकडे पाठ फिरवली होती ती शाळा आज दोन्ही हात पसरून त्याचे स्वागत करायला सिद्ध झाली होती. हा गरीब हा श्रीमंत असा कोणताच भेदभाव या शाळेने कधीच केला नाही ....आणि आज सुद्धा या प्रचंड मोठ्या संकटामध्ये सर्वांना सामावून घेऊन उभी आहे ती माझी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा. याच प्राथमिक शाळेने सर्व लोकांची 14 दिवस मनोभावे सेवा केली आणि आज या सर्वांचा शाळेतील शेवटचा दिवस..... आज खऱ्या अर्थाने हे क्वारंटाईन लोक मुक्त होणार होते. संजू सुद्धा त्यामध्ये होता. ज्या शाळेला आपण हीन लेखले त्या शाळेने.... आणि त्याच शाळेच्या संस्कारांची शिदोरी जीवनभर जोपासणाऱ्या गावातील लोकांनी आपल्याला सामावून घेतले त्यामुळे नकळतच संजूचे डोळे भरून आले आणि.... पश्चातापाचे दोन अश्रू मैदानावरील मातीत मिसळले.
              
            सौ. राजश्री पोतदार

22/05/2020

अवहेलना शिक्षकांची, अवनती राज्याची.


नेल्सन मंडेलांनी म्हटलंय," एखाद्या देशाला उद्ध्वस्त करायचं असेल तर त्या देशावर बॉम्ब टाकून तो देश उद्ध्वस्त होणार नाही, तर त्या देशाची शिक्षण व्यवस्था उध्वस्त करा." आपल्या देशाला गुरुची थोर परंपरा आहे . "गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा" अशी गुरूची महिमा गाणारी भारतीय  संस्कृती!  गुरुंना अमाप असा आदर होता. परंतु आता शिक्षणाप्रती सरकारचा आणि समाजाचा दृष्टिकोन बदललेला आहे. ' आज मागता येत नाही भिक म्हणून मास्तरकी शीक' अशी अवस्था  शिक्षणाची झालेली आहे. शिक्षकांचं  प्रचंड शोषण महाराष्ट्रात सुरु आहे. विनाअनुदानित शिक्षक वीस -वीस वर्षे शुन्य रुपये पगार घेऊन काम करत आहेत. काही शिक्षक तर वीस टक्के पगार घेऊन सेवानिवृत्त झालेले आहेत . आयुष्य शिक्षण क्षेत्राला देऊनही दोन वेळची भाकरी शिक्षकांच्या पोटाला मिळत नाही. अनेकांचे संसार उघड्यावर पडलेले आहेत. केवळ उद्या आपल्याला पगार मिळेल या आशेवर ते आणि त्यांची कुटूंबिय जगत आहेत. काही शिक्षक शाळा सुटल्यावर भाजी विक्री करत आहे, कोणी शेतात कामाला जात आहेत. कोणी मोलमजुरी करत आहेत. लाखो रुपये भरून, घरची जमीन विकून त्यांनी डीएड -बीएड केलेलं आहे.  विनानुदानित नोकरीसाठीही लाखो रुपये संस्थाचालकाला दिलेले आहे.आज भयावह स्थिती शिक्षकांच्या जीवनात आहे .
अनुदानित अथवा सरकारी शाळेतील शिक्षकांना शाळेत शिकवू दिलं जात नाही. शिक्षकांनी शाळेत शिकू नये अशा प्रकारची व्यवस्था शिक्षण विभागा करत आहे. ग्रामीण भागात आरोग्य विभाग, ग्रामविकास विभाग व महसुल विभाग यांची सर्व कामे शिक्षकच करत आहेत. सकाळी शौचास बसणा-या लोकांना मोजण्यापासुन, उंदरं- मांजरं  मोजणं, दारुच्या दुकानांवर लोकांना शिस्तीत उभं करणं, बीएलओची ड्युटी करणं, इलेक्शनची ड्युटी करणं, जनगणनेचं काम करणे, चेकपोस्टवर रात्रं दिवस वाहनं तपासणं, शिधावाटप केंद्रांवर धान्य वितरीत करणं, घराघरात जाऊन सर्व्हे करणं, थर्मामीटर घेऊन ताप तपासणे, विलगीकरण इमारतींची देखरेख करणं किती कामे शिक्षकांनी करायची? इतकंच नाही तर  सुट्टीच्या कालावधीत शिक्षणाधिकाऱ्यांच्या मतानुसार ऑनलाइन लेक्चर्स घेणं, पिपीटी तयार करणं, रिझल्ट तयार करणं, दहावी - बारावीचे पेपर तपासणे, शिक्षकांनी नक्की काय काय करायचं?  राज्यातील दुस-या विभागाचा असा कोणताही कर्मचारी सांगता येईल का?की, जो आपले काम सोडून दुस-या विभागातील कामे करतो. राज्य सरकारला ज्या गोष्टींची माहिती हवी असेल ताबडतोब ती कामे शिक्षकांना लावली जातात. कामं करण्यास नकार दिला तर बडतर्फ करू, नोकरीतून काढून टाकू, पगार बंद करू अशा प्रकारच्या लेखी धमक्याही दिल्या जातात. निवडणुकीची कामे तर शिपाई, क्लार्क यांच्या हाताखाली शिक्षकांना करावी लागतात. ग्रामीण भागात तर तलाठी, ग्रामसेवकच शिक्षकांचे मालक असतात. त्यांच्या वाट्याची सर्व कामे शिक्षकांना मान खाली घालून करावी लागत आहेत. देशभरात शिक्षकांएवढी अपमानित जमात दुसरी कोणतीच नसेल.
‍जगप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ  रघुराम राजन व अमर्त्य सेन यांनी स्पष्ट सांगितलेले आहे- भारताने शिक्षण, आरोग्य व भौतिक सुविधा यामध्ये गुंतवणूक करायला हवी. परंतु केंद्र सरकार असेल अथवा राज्य सरकार शिक्षण व्यवस्थेतून आपलं अंग काढू पाहत आहेत. सर्व सरकारी शाळा व सरकारी हॉस्पिटल्स ही भांडवलदारांच्या ताब्यात देण्याचा सपाटा त्यांनी सुरू केलेला आहे.  सरकारी शाळांचा खाजगीकरणाचा डाव आखला जात आहे. सरकारी शाळा लगेच बंद करता येत नाही म्हणून त्यांना बदनाम केले जात आहे.  शिक्षकांनी शाळेत शिकवूच नये यासाठी नानाविध प्रकारची अशैक्षणिक कामे दिली जात आहेत. शिक्षकांची अप्रतिष्ठा होईल अशी कामे जाणीवपूर्व थोपवली जात आहेत. कागदी आणि ऑनलाइन कामांच्या जाळ्यात शिक्षकांना अडकवलं आहे. सरकारी शाळांना बदनाम केले जात आहे . कमी पटसंख्येचे कारण दाखवून शाळा बंद करण्याचा डाव आखला जात आहे. इंग्रजी माध्यमांच्या आणि मराठी माध्यमाच्या स्वयं अर्थशासीत शाळांची मागेल त्याला खैरात वाटली जात आहे. अनुदानीत व सरकारी शाळेत शिक्षक होण्यासाठी टीईटी व टेंट यांची अट आहे. मात्र विनानुदानित, स्वयंअर्थशासीत  सर्व  माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षकांच्या  पात्रतेची कोणत्याच अटींची पडताळणी होत नाही. शिक्षकांना घाण्याचं बैल केला आहे काय ? त्याने केवळ मान खाली घालून काम करायचं. सरकारला प्रश्न विचारायचे नाहीत अन्यथा तुमच्यावर गुन्हे दाखल होतील. विनाअनुदानित शिक्षक अनुदान मागायला गेले तर त्यांच्यावर लाठीचार्ज करून रक्तबंबाळ केले गेले.  शिक्षकांची एवढी अवहेलना भारताला परवडणारी नाही . केवळ अनुदानित व सरकारी शिक्षणच या देशाला वाचवू शकतं. सरकारी कर्मचाऱ्यांच्या नावाने नेहमी शिमगा करणा-यांच्या आज लक्षात आलं असेल. कोरोनाच्या या लढाईत आज केवळ सरकारी कर्मचारीच काम करत आहेत.  खासगीकरणातील डॉक्टर्स , हॉस्पिटल्स व अत्यावश्यक सेवा देणारे कधीच पळून गेले आहेत. आज केवळ सरकारी डॉक्टर्स, पोलिस, नर्सेस, शिक्षक आणि इतर सरकारी कर्मचारी  आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. भांडवलीकरण आणि खाजगीकरणाचे पुजारी आज मुग गिळुन गप्प बसले आहेत.
अनेक एनजीओ  व स्वयंसेवी संस्थांनीसुद्धा विशेष भूमिका कोरोनाच्या काळात पार पाडलेली आहे. शिक्षकही पहिल्या दिवसापासून कोरोनाची लढाई लढत आहेत. या लढाईमध्ये अनेक शिक्षकांचे जीवही गेलेले आहेत . अनेकदा मागणी करूनही शिक्षकांना विमा संरक्षण सरकारने दिलेले नाही. अशा राष्ट्रीय आपत्तीच्या काळात लढणाऱ्या लोकांच्या पाठीमागे सरकारनं उभे राहणं गरजेचं आहे . त्यांना आवश्यक त्या संरक्षण सुविधा पुरवणं आवश्यक आहे . कोणत्याही संरक्षणाविना पोलीस, नर्सेस, डॉक्टर्स लढत असल्यामुळे अनेकांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. आता शिक्षकांनाही सर्व्हेसाठी व  ताप तपासण्यासाठी किंवा विलगीकरण केंद्र सांभाळण्यासाठी नेमणार असल्याच्या बातम्या येत आहेत. शिक्षकांची माहितीही मागविली आहे.  काही शिक्षक गावी आहेत त्यांना गावावरुन येण्यासाठी सार्वजनिक वाहनं व पासेस उपलब्ध करून द्यावे लागतील. कदाचित त्यांना मुंबईत १४ दिवसांसाठी क्वारंटाईन करावे लागेल. मुंबईबाहेर नवी मुंबई, ठाणे, कल्याण, वसई विरार याठिकाणी हजारो शिक्षक रहात आहेत. त्यांनाही मुंबईत  प्रवेश नाही.  यावर कोणीही विचार करत नाही. फक्त ऑर्डर काढल्या जात आहेत. शिक्षकांच्या संरक्षणाची व प्रवासाची कोणतीही व्यवस्था सरकार पाहत नाही.  शिक्षकांची सुरक्षितता ही कोणाच्याही लक्षात येत नाही. दहावीचे पेपर तपासण्यासाठीची शिक्षण मंडळाने ऑर्डर काढली. शिक्षण विभागाने परिपत्रक काढताना किमान गृह विभाग अथवा महानगरपालिकेच्या आयुक्त यांच्याशी चर्चा करायला हवी होती. शिक्षकांना पास उपलब्ध नाहीत. प्रवासाची कोणतीही व्यवस्था नाही. शिक्षक कसे तपासणार पेपर ? कोणाकडे मागायची दाद? 
लढणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारने किमान प्रोत्साहन भत्ता देणे आवश्यक होते. याऐवजी केंद्र सरकारने तर या लढणाऱ्या कर्मचाऱ्यांचा वाढीव महागाई भत्ता पुढील दीड वर्ष रोखुन धरण्याचा निर्णय घेतला आहे. २०२१ साल संपेपर्यंत कोणत्याही कर्मचाऱ्याचा पगार वाढणार नाही. केंद्र सरकार डीए देणार नाही त्यामुळे राज्य सरकारही तो डिए देणार नाही.  सहाजिकच राज्यातील कर्मचा-यांचे पगारही दिड वर्ष वाढणार नाहीत. देशभरात मजुरांचं प्रचंड स्थलांतर होत आहे . सहाजिकच सरकारी शाळांमध्ये शेतकरी, कष्टकरी व मजुरांची मुले शिकत आहेत. तीच निघून  गेल्यामुळे सरकारी व अनुदानित शाळांमधील मुलांचा पट पुढील वर्षी कमी असणार आहे . सरकार संचमान्यता करून पुन्हा एकदा हजारो शिक्षकांना अतिरिक्त ठरवेल किंवा कमी पटसंख्येच्या नावावर शाळा बंद करतील. सरकारी अथवा अनुदानित शाळेतील एक शिक्षक जरी कमी झाला तर तीस विद्यार्थ्यांचा मोफत शिक्षणाचा अधिकार आपोआप संपुष्टात येतो. त्यामुळे सरकारी, अनुदानित व गोरगरिबांचं शिक्षण वाचवायला हवं. त्यासाठी पुढील वर्षी संच मान्यता न करता आहे ती शिक्षक संख्या कायम ठेवावी लागेल.  देश आणि राज्य वाचवायचं असेल तर सरकारी व अनुदानित शिक्षण अत्यावश्यक आहे. शिक्षकांची पत आणि सन्मान राखला पाहिजे. शिक्षणातील सर्व ज्वलंत, धगधगत्या समस्यांकडे सरकारने आता लक्ष दयायलाच हवे अन्यथा कोरोनापेक्षाही भयंकर परिस्थितीस सर्वांना सामोरे जावे लागेल  यात शंकाच  नाही!!!
जालिंदर देवराम सरोदे
 प्रमुख कार्यवाह शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य.
अध्यक्ष -मुंबई ग्रॅजुएट फोरम .

21/05/2020

आता परीक्षा शिक्षणाची----

कोरोनाच्या संकटामुळे येत्या काळात शिक्षण व्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी पंचसूत्री सुचवणार हा लेख 
आता जून सुरू होईल. शाळांचे वेध लागतील. पदवी आणि पदविका अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर झाला आहे. दहावी आणि बारावीचे पेपर अजून तपासून व्हायचे आहेत, तरीही निकाल वेळेवर लागेल, असा विश्वास प्रशासनाला आहे. मध्यंतरी शिक्षणमंत्र्यांनी १५ जूनला शाळा सुरू होण्याच्या दृष्टीने तयारी करत आहोत, असे म्हटले होते. एकीकडे, अनेक शिक्षक चेकपोस्टवर जीव धोक्यात घालून सेवा बजावत आहेत, तर दुसरीकडे मुले उन्हाळ्याच्या सुटीत शिक्षण घेत आहेत. राज्यातील २० टक्के पालकांच्या मोबाइलवर इंटरनेट सुविधा आहे. त्याचवेळी मे महिन्यात दीक्षा अॅपचा वापर चार लाख ६० हजार जणांनी केला, असे एससीईआरटीने म्हटले आहे. मग सध्याच्या संकटाला शिक्षण विभाग कसा सामोरा जाणार?
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जाहीर केल्यानुसार, आता प्रत्येक वर्गासाठी टीव्ही वाहिनी सुरू होणार आहेत. आपल्या राज्यात प्रत्येक शाळेपर्यंत पाठ्यपुस्तके पोहोचविण्याच्या तयारीत प्रशासन आहे. सध्या, शिकण्याच्या प्रक्रियेचे अतिसुलभीकरण होत आहे. ते करताना मुले सामूहिकरीतीने शिकतात असा विचारप्रवाह यामागे असावा. आश्चर्य म्हणजे फिनलंड किंवा तैवान या देशांनी असे उपाय योजलेले नाहीत. ना तिथल्या सरकारने मुलांसाठी टीव्ही चॅनेल सुरू केले, ना कोणते अॅप वापरायला सांगितले. अमेरिकेतही १३ टक्के डिजिटल पॉवर्टी असल्याचे जागतिक बँकेच्या (द कोव्हिड-१९ पँडेमिक : शॉक्स टू एज्युकेशन अँड पॉलिसी रिस्पॉन्सेस) अहवालात म्हटले आहे. आपल्याकडे याची अधिकृत आकडेवारी नाही; त्यामुळे टीव्ही अथवा इंटरनेटद्वारे प्राथमिक शिक्षण देण्यात खूप मर्यादा आहेत. त्यासाठी पायाभूत सुविधा लगेचच मिळणेही अशक्य आहे. अशा वेळी पुढील मुद्दे विचारात घ्यावेत, असे वाटते.
१. अल्प मुदतीचे अभ्यासक्रम आणि लवचिक मूल्यमापन : परिस्थिती पूर्वपदावर येण्यास किती वेळ लागेल, हे माहीत नाही. अशा स्थितीत पारंपरिक अभ्यासक्रम पूर्ण करावा आणि अपेक्षित अध्ययन पातळी गाठली जावी, ही अपेक्षा अव्यवहार्य आहे. सध्या शैक्षणिक वर्ष सहा महिने करण्यात यावे आणि यासाठी कौशल्य विकसनाला महत्त्व देणाऱ्या अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमाची रचना करावी. कुटुंब आणि निसर्ग हा आताच्या घडीला ज्ञानार्जन करण्याचा सुरक्षित स्रोत मुलांकडे आहे. शिक्षक, वेगवेगळे अॅप, टीव्ही वाहिन्या आणि पाठ्यपुस्तके हे स्रोत आज काहीसे असुरक्षित आहेत; परंतु ते पूर्ण दुर्लक्षित न करता, मर्यादित सहकार्यातून शिक्षण पुढे न्यावे लागेल. आजही आपण लेखी परीक्षेतील मूल्यमापनावर अवलंबून आहोत. वार्षिक परीक्षा झाल्याशिवाय आपले शैक्षणिक वर्ष संपत नाही. आता पारंपरिक मूल्यमापन साधने बाजूला ठेवत पीबीई (पॉइंट, बॅच अँड एक्सपिरिअन्स अवर्स) पद्धतीचा वापर करावा लागेल. यामध्ये मुलांना अभ्यासक्रमावर आधारित विशिष्ट कृती पूर्ण केल्यास विशिष्ट गुण देता येतील. ते प्राप्त केल्यानंतर त्यांना काही बॅच देता येतील आणि मग सत्राखेर अनुभवाचे एकूण तास नोंदवता येतील. कॅनडातील शिक्षक स्कॉट हर्बर्ट यांनी ही मूल्यमापन पद्धती वापरात आणली. आपल्याकडे या तंत्राचा वापर करण्यास हीच अनुकूल परिस्थिती आहे. अर्थात, ती 'केजी टू पीजी' वापरली, तरच अपेक्षित बदल दिसतील.

२. शाळा व परिसरात आरोग्यदायक स्थिती : ग्रीन असो वा रेड झोन, शालेय परिसरात आरोग्यदायक सुस्थिती हवीच. शाळांमध्ये सुरक्षित वावराच्या नियमाचे पालन होणे कठीण आहे. अशा परिस्थितीत, सॅनिटायझर मुबलक प्रमाणात लागतील आणि अशा सुविधांसाठी लोकसहभागाचा आग्रह धरून जबाबदारी टाळू नये. मुलांनी शाळेत यावे असे प्रशासनाला वाटत असेल, तर आरोग्य सुविधा ही प्रशासनाची जबाबदारी आहे. पैसे नसण्याच्या नावाखाली बेजबाबदारपणा झाला, तर तो मुलांच्या जिवावर बेतू शकतो. करोनाशी सामना करीत शाळा चालविण्यासाठी पुरेशी तयारी करून, मगच शाळा सुरू करावी.
. शिक्षक प्रशिक्षण आणि कौशल्य विकसन : आपल्याकडील शिक्षक कोणतेही काम करू शकतात, त्यांना प्रशिक्षण देण्याची गरज नाही, अशी मानसिकता आहे. यातून त्यांना कधी चेक पोस्टवर नेमतात, तर कधी शाळेचे बांधकाम करायला लावतात. सध्या शिक्षकांना मानसिकदृष्ट्या अधिक कणखर बनवण्यासाठी आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यास सक्षम पिढी घडवण्यासाठी प्रशिक्षित केले जाणे आवश्यक वाटते. सध्या राज्यात दीड लाखांहून अधिक शिक्षक तंत्रस्नेही आहेत; मात्र ते तंत्रस्नेही अध्यापन करण्यास सक्षम आहेत का? टीव्ही चॅनेल सुरू केले, तरी त्यावर अध्यापन करू शकणाऱ्या शिक्षकांची फळी हवी. रेडिओ अथवा टीव्हीवर घ्यायच्या पाठांचे नियोजन व सादरीकरण करण्यासाठी अनुभवी शिक्षक नाहीत. केवळ राज्यस्तरावरच नव्हे, तर केंद्रीय स्तरावरही अशा शिक्षकांची वानवा आहे. मनुष्यबळ विकास खात्याच्या वाहिनीवर अनेकदा एनसीईआरटीचे प्राध्यापक पाठ घेतात. व्हर्च्युअल पद्धतीने मुलांना शिकविण्यासाठी 'बालभारती'च्या माजी कर्मचाऱ्यांची मदत घेता येईल. अशा कार्यक्रमाचे खासगीकरण करू नये. ज्यांना वर्गाध्यापानाचा अनुभव आहे अशाच शिक्षकांची निवड करून, असे कार्यक्रम सादर करावेत. सध्याची वेळ शिक्षकांना प्रशिक्षित करण्याची आहे. अर्थात, शून्य खर्चात प्रशिक्षण देण्याचा पूर्व अनुभव लक्षात घेता, शिक्षकांना डेटा अलाउन्स दिला जाणे गरजेचे आहे, तरच ते गांभीर्याने घेतले जाईल. अशा प्रशिक्षणात व्हर्चुअल अध्यापन आणि व्हर्च्युअल जगातील सुरक्षितता यांवर भर हवा.

. उपाययोजनांचे विकेंद्रीकरण व प्रत्येक मूल शिकण्याची हमी : मागील पाच वर्षांत शिक्षण क्षेत्रात निर्णय प्रक्रियेचे केंद्रीकरण झाले आहे. सत्र परीक्षेचे पेपरही राज्यस्तरावरून जातात. आत जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना अधिक अधिकार मिळावेत. जिल्ह्यातील शैक्षणिक परिस्थिती लक्षात घेऊन, काही उपक्रम राबविण्याचे स्वातंत्र्य त्यांना नाही. प्रत्येक जिल्ह्याची शैक्षणिक परिस्थिती वेगवेगळी आहे. या परिस्थितीची जाण फील्डवरील अधिकाऱ्यांना अधिक असते. त्यांना म्हणूनच स्वातंत्र्य हवे. गेल्या दशकात ९५ टक्क्यांहून अधिक मुलांना शाळेत दाखल करण्यात आपण यशस्वी झालो. आता व्हॉट्सअॅपवर आलेल्या ऑनलाइन टेस्ट व व्हिडिओच्या लिंक पाहून मुले शिकतात, असा समज करून घेणे घातक आहे. प्रत्येकाची शिकण्याची पद्धत वेगवेगळी आहे, हे लक्षात घेऊनच उपाययोजना कराव्यात.
५. दीक्षा अॅपसह इतर तंत्रसुलभ सुविधा : पाठ्यपुस्तकात क्यूआर कोड वापरण्याचा निर्णय २०१५मध्ये झाला; मात्र सर्व इयत्तांच्या प्रत्येक पाठाला पूरक असे डिजिटल साहित्य उपलब्ध झालेले नाही. याला जबाबदार कोण, याची चर्चा करण्याची ही वेळ नाही; मात्र याच दीक्षा अॅपच्या उपयुक्ततेबाबत कोलंबिया विद्यापीठातील संशोधक तारा ओकेंसी आणि आचल शर्मा यांनी २०१९मध्ये दिलेल्या अहवालातील शिफारशी त्वरित अमलात आणाव्यात. यातून जी माहिती मिळत आहे, त्या आधारे पुढील नियोजन व्हावे. निश्चित धोरण, निर्णयांचे विकेंद्रीकरण व शिक्षकांना अधिक सक्षम करणे, ही त्रिसूत्री आवश्यक आहे.

(लेखक  जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आहेत.)