सुस्वागतम!.. सुस्वागतम!!.. सुस्वागतम!!!...मी श्री.विलास काकुळते पाटील ब्लाॅग मध्ये आपले स्वागत करतो.
!!घराबाहेर जाणे टाळा-कोरोणाला बसेल आळा.!!

23/05/2020

पश्चात्ताप


एक छोटसं गाव होतं...... आणि त्या गावांमध्ये अगदी घट्ट मैत्री असलेली दोन मुले होती राजू आणि संजू ...वय वर्ष प्रत्येकी दोन... सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत दोघेही अगदी बरोबर असायचे .राजूला संजू शिवाय आणि संजूला राजू शिवाय अजिबात म्हणजे अजिबात करमायचे नाही. खेळणे ,भांडणे, मारामार्‍या आणि रुसवे-फुगवे सगळीच गंमत असायची .
       संजू चा भला मोठा बंगला तर त्याच्या शेजारीच राजूचे  ऐसपैस घर.  दोन्हीही घरात चांगला घरोबा होता .नवीन काही पदार्थ केला तर दोन्ही घरांमध्ये तो जात येत असे. राजू व संजूची आई  सुद्धा एकमेकींच्या छान मैत्रिणी होत्या. 
         दिवसांमागून दिवस जात होते.... राजू व संजू आता मोठे होत होते. आता दोघांनाही शाळेत घालण्याची वेळ आली. संजू च्या बाबांनी ठरवले....जर संजूचे भविष्य उज्ज्वल व्हायचे असेल तर त्याचे नाव शहरातल्या एखाद्या मोठ्या शाळेमध्ये घातले पाहिजे आणि त्याप्रमाणे संजू च्या बाबांनी संजू चे नाव खूप मोठ्या शाळेमध्ये खूप पैसे भरून घातले. तर राजूच्या बाबांनी राजू चे नाव गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये दाखल केले. संजू आता रोज स्कूल बसने दिमाखदार गणवेशात शाळेत जाऊ लागला.... तर राजू सुद्धा स्वच्छ व नीटनेटक्या  नव्याकोऱ्या गणवेशात शाळेत जाऊ लागला.  दोघांनाही आता पहिल्यासारखे भेटायला मिळत नव्हते म्हणून वाईट वाटे. परंतु आपापल्या शाळेत  त्यांना नवनवीन सवंगडी मिळाल्यामुळे आता दोघांच्या दोन वाटा वेगवेगळ्या देशांना जावू लागल्या. 
        मोठ्या शाळेत श्रीमंत मुलांच्या संगतीत असल्यामुळे संजूला सुद्धा आता राजू चा विसर पडला. आपल्या शाळेच्या तुलनेत जिल्हा परिषदेच्या शाळेच्या बाबतीत त्याच्या मनामध्ये तुच्छ भावना तयार झाली होती. 
         वर्षांमागून वर्षे गेली.... दोघेही खूप हुशार होते. आपापल्या वर्गांमध्ये दोघांचे नंबर असत. बारावीची परीक्षा झाली तसे संजूने  इंजिनिअरिंग कॉलेज ला ऍडमिशन घेतले. परंतु राजूला मात्र गावाचा शेतीचा खूप लळा  असल्यामुळे त्याने एग्रीकल्चर कॉलेजला ऍडमिशन घेतले. आता दोघेही दोन वाटांवरून आपापल्या दिशेने खूप पुढे निघून गेले होते. संजूला शहरामध्ये खूप मोठ्या कंपनीत खूप मोठ्या पगाराची नोकरी लागली तर राजूने आपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या गावातील शेतीसाठी व लोकांसाठी करायचा असे ठरवले. 
        आता राजू व त्याचे मित्र फावल्या वेळेत एकत्र येऊन गावाच्या विकासासाठी नवनवीन योजना तयार करून त्या अमलात आणू लागले. गावातील रस्ते, वीज, पाणी पुरवठा अशा सर्वच महत्त्वाच्या गोष्टीं  मध्ये त्यांनी सुधारणा करण्यास सुरुवात केली. एके दिवशी गावातील पारावर बसलेले असताना आपण ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलो त्या शाळेचे ऋण आपल्यावर आहे आणि त्यासाठी सुद्धा आपण काहीतरी केले पाहिजे असे सर्वानुमते ठरले... व लगेचच शाळेतील हेडमास्तरांची भेट घेऊन शाळेसाठी कोण कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत याची यादी तयार झाली. शाळेचे रंगकाम, किरकोळ दुरुस्ती व कंपाउंड टेबल-खुर्च्या ,मुलांना बसण्यासाठी बाके इत्यादी गोष्टींची पूर्तता करण्यात आली.  आणि कोणत्याही शहरातील शाळेच्या तोडीस-तोड शाळा दिसू लागली उत्साही व मेहनती शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या बाबतीत कधीच तडजोड केली नव्हती , म्हणून त्याच्या मित्रांसारखी सुजान पिढी या शाळेमधून घडू लागली.
           तिकडे संजू खूप मोठा अधिकारी झाला. क्लब, विकेंड, मित्र-मैत्रिणी, देश-परदेशातील सहली, पार्ट्या अशी हाय सोसायटीतील राहणी त्याच्या अंगवळणी पडली. गावाचा त्याला केव्हाच विसर पडला होता.
          आणि...... अशातच न भूतो न भविष्यती असा कोरोना नामक साथरोग चीनमध्ये आला... आणि थोड्याच दिवसात त्याने सर्व जगामध्ये हात-पाय पसरायला सुरुवात केली. परदेशवारी 
  करणाऱ्या लोकांच्या कृपेमुळे तो भारतात सुद्धा येऊन पोहोचला. यावर कोणताही उपाय नसल्यामुळे अचानकच लॉक डाऊन ची घोषणा झाली... व सर्व शहरी बाबू आपापल्या घरांमध्ये अडकून पडले.लाॅक डाऊनचा काळ वाढतच गेला. तसतशी सर्वांची विचार प्रणाली जागृत होऊ लागली. आणि ज्या गावाकडे.... शहरातल्या लोकांनी कायमचीच पाठ फिरवली होती तो गाव आता सर्व चाकरमान्यांना खुणावू लागला. शहरातल्या सुख-सुविधा सोडून गावाकडे वळून पाहण्याची तसदी सुद्धा न घेतलेल्या लोकांना गड्या आपला गाव बरा असे वाटू लागले. 
        शहरात चाळीस दिवस बंदीवासात घालवल्यानंतर सरकारने सर्व लोकांना आपापल्या गावी जाण्यासाठी परवाने द्यायला सुरुवात केली. गावातील लोकांनीही मोठ्या मनाने त्यांना गावात घेण्याची तयारी दर्शवली पण.......... कोरोनाचे संकट तर तसेच होते ना  ?  आणि यावर तोडगा निघाला.... आणि धावून आली ती जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा...... 
       संजूने ज्या शाळेकडे पाठ फिरवली होती ती शाळा आज दोन्ही हात पसरून त्याचे स्वागत करायला सिद्ध झाली होती. हा गरीब हा श्रीमंत असा कोणताच भेदभाव या शाळेने कधीच केला नाही ....आणि आज सुद्धा या प्रचंड मोठ्या संकटामध्ये सर्वांना सामावून घेऊन उभी आहे ती माझी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा. याच प्राथमिक शाळेने सर्व लोकांची 14 दिवस मनोभावे सेवा केली आणि आज या सर्वांचा शाळेतील शेवटचा दिवस..... आज खऱ्या अर्थाने हे क्वारंटाईन लोक मुक्त होणार होते. संजू सुद्धा त्यामध्ये होता. ज्या शाळेला आपण हीन लेखले त्या शाळेने.... आणि त्याच शाळेच्या संस्कारांची शिदोरी जीवनभर जोपासणाऱ्या गावातील लोकांनी आपल्याला सामावून घेतले त्यामुळे नकळतच संजूचे डोळे भरून आले आणि.... पश्चातापाचे दोन अश्रू मैदानावरील मातीत मिसळले.
              
            सौ. राजश्री पोतदार

No comments:

Post a Comment