राष्ट्रीय शिक्षण धोरणात(२०२०) ऑनलाइन शिक्षणाला दारं खुली केली आहेत. डेटा आणि अल्गोरिदमच्या 'इंधना'वर चालणाऱ्या आजच्या ग्लोबल डिजिटल जगात प्रचंड डेटा हाती आल्यानं मार्केट नक्की तेजीत येईल. शेअर बाजारात या कंपन्यांचा निर्देशांक वधारल्याचा भरपूर होईल. आपल्या देशाचं भविष्य असलेल्या शाळकरी मुलांच्या आयुष्यात मात्र त्यामुळं मोठी ‘मानसिक, भावनिक मंदी’ येऊ घातलीय! सावध होऊन काळाच्या हाका ऐकणार आहोत का? हाच खरा प्रश्न आहे... या अस्वस्थ वर्तमानाची भयसूचक कहाणी सांगणारा लेख सकाळ माध्यम समूहाच्या अॅग्रोवन दैनिकात आज प्रसिद्ध झालाय...
________________________या मोबाइलवेडाचं करायचं काय?
- भाऊसाहेब चासकर
_________________________
“माझ्या मोबाइलमधे फेसबुकवर गेलो की नको नको ते दिसू लागतंय. उघड्या-नागड्या पोरींच्या व्हिडीओच्या लिंक्स स्क्रीनवर ओपन होताय. मुलं अभ्यासाला माझा फोन घेतात. असलं काही त्यांना दिसलं तर? या विचारानं मी चक्रावून गेलो. एका माहितगार मित्राला मोबाइल दाखवला. तो म्हणला तू पेजेस लाइक केलेत म्हणून त्या साइट्सवरून नवीन व्हिडीओचं नोटिफिकेशन येतंय. मी असली फालतू पेजेस लाइक केली नाहीत. घरी चौकशी केल्यानंतर लक्षात आलं की अभ्यासासाठी मोबाइल मुलांच्या हातात असतो. हा त्यांचा ‘उद्योग’ आहे...” एक मित्र परवा रात्री फोनवर आणखीन बरंच सांगत होता. तो अस्वस्थ होता. काळजीचे भुंगे त्याचं मन कुरतडत असले पाहिजेत, याची खात्री पटली. त्याला थांबवत मधे बोलायचा प्रयत्न केला. तो माझं ऐकून घ्यायच्या मूडमध्ये नव्हता. पुढं बोलतच राहिला...
“पोरांचं बारकाईनं निरीक्षण करतोय. सकाळी उठल्या-उठल्या आमचा प्रतिक(नाव बदललंय.) मोबाइलवर असतो. चहा नको का पाणी नको. दिवसभर पोरं व्हिडीओ बघतात. आसपासच्या पोरांनाही बोलावतात. गेम खेळत बसतात. धाकट्यानं वर्गातल्या पोरापोरींचा व्हॉटसअॅप ग्रुप केलाय. त्यांचं टाइमपास चॅटिंग सुरू असतं. पोरं रोज फोन कॉल्स करून एकमेकांशी बोलत बसतात. इतकं काय काम असतं यांचं? माझा दीड जीबी डेटा संपला की आईचा, आजोबांचा मोबाइल घेणार. घरातल्या तिन्ही स्मार्टफोनचा साडेचार जीबी डेटा सायंकाळी पाचपर्यंत संपलेला असतो! बरं, आम्ही शेतकरी माणसं. सदा न कदा आमच्या कामात. दिवसभर यांच्याजवळ बसून लक्ष द्यायचं झालं तर शेतीची कामं कोण करणार?” माझं काही ऐकून न घेता मित्र बोलतच राहिला. थांबवायचा प्रयत्न केला, पण व्यर्थ...
“तुम्ही शिक्षक इतका काय अभ्यास देतात रे पोरांना? मी काय म्हणतो, शिकायचं सोडून मोबाइलचं वेड लावणारं हे ऑनलाइन शिक्षण पाहिजेल कशाला? शाळा भरवा ना त्यापेक्षा. झाला तर होऊ द्या कोरोना. तो परवडला. चार-आठ दिवसांनी तो बरा होईल. हा मोबाइल कोरोनापेक्षा लय भयानक आहे. दोन-अडीच महिन्यांपासून अभ्यासाच्या नावाखाली पोरं असलं बघत्यात, हे बघून लय राग आलाय. हे सारं मी घरच्यांना सांगू शकत नाही. त्यांना शॉक बसंल. रात्री इथं मळ्यात वाघाची भीती असते. तरी घराबाहेर येऊन तुला फोन लावलाय. या मोबाइलपायी पोरांची आख्खी पिढी बरबाद होऊन जाईल, लिहून ठेव. तू टीव्हीवर बोलतो. ‘ऑनलाइन शिक्षण बंद करा’ अशी मागणी कर आमच्यातर्फे. काही अडचण असली तर माझी मुलाखत घे...” एवढं बोलू झाल्यावर तो थांबला. व्यक्त होणं ही त्याची गरज होती. माझ्या परीनं त्याची समजूत घालायचा प्रयत्न केला. त्याला दोन मुलं आहेत. थोरला आठवीत, धाकटा पाचवीत. कोरोना काळात मुलं आणि मोठ्या माणसांचा स्क्रीनटाइम प्रचंड वाढलाय. डोळे, मन-मेंदू, हाडं यांवर भयंकर वाईट परिणाम होणारेत. बोलताना ‘आपण एकटे असे पालक नाही आहोत,’ हे लक्षात आल्यावर मित्राचा ताण हलका झाला. ‘सांगता येत नाही आणि सहनही होत नाही’, अशी अनेक पालकांची सैरभैर मन:स्थिती आहे. या अवघडलेल्या मनोवस्थेतून जाणाऱ्या पालकांचा हा प्रतिनिधी आहे. त्यानं फोन ठेवला. असंख्य प्रश्नांचं मोहळ उठलं मनात.
कोरोना आला. लॉकडाउन सुरू झाला. कोविड-१९ हा विषाणू संपर्कामधून अत्यंत झपाट्यानं पसरत असल्यानं शाळा-महाविद्यालयं बंद ठेवणं भाग पडलं. हसती-खेळती-बागडती मुलं अचानक घरात बंद झाली. प्रचंड ऊर्जा असलेल्या मुलांना कशात तरी गुंतवून ठेवायच्या अत्यंत सद्हेतूनं शिक्षण विभागानं ‘शाळा बंद, शिक्षण सुरू’ असा घरचा अभ्यास देणारी मालिका सुरू केली. ही मालिका सुरू झाल्यानंतर ‘तुला कशाला हवा मोबाइल?’ असं दरडावत मुलांच्या हातात मोबाइल द्यायला नकार देणारे पालक आता तसं करू शकत नव्हते. मुलांना जणू मोबाइल वापराचा ‘सरकारी परवाना’ मिळाला! इंटरनेट जोडणीसह लहान मुलांच्या हातात स्मार्टफोन आला. सोबत अनेक धोके घेऊन. लागलीच काही वर्षे दबा धरून बसलेल्या ‘डिजिटल मार्केट’नं रंग उधळायला जोरदार सुरूवात केली. दूरचित्रवाणी वाहिन्या आणि वृत्तपत्रांसह फेसबुक-युट्यूबसारख्या समाजमाध्यमांमधून विद्यार्थी-पालकांवर जाहिरातींचा पद्धतशीर मारा सुरू झाला. मुलं-पालकांना भावनिक आवाहन करताना, उज्ज्वल उद्याचं स्वप्न जाहिराती दाखवू लागल्या. अभ्यास बुडाल्यास आपली मुलं शिक्षणात मागं पडतील, अशी भीती पालकांच्या मनात होतीच. डिजिटल मार्केटनं त्यांना खेचून घेतलं. स्मार्टफोनचा खप इतका वाढला की काळाबाजार सुरू झाला. नेटवर्क असेल तिथं बसून गाव-खेड्यातली मुलं मोबाइलवर अभ्यास करू लागली. स्मार्टफोनच्या मदतीनं अभ्यास करणारी मुलं हे दृश्य बघून पालक मनोमन सुखावले. अनेकांना हे आधुनिकतेचं लक्षण वाटू लागलं.
अगदी लॉकडाउन जाहीर व्हायच्या तोंडावर ‘स्क्रीन टाइम’ वाढत असल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त करणारे डोळ्यांचे डॉक्टर, मनोविकारतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि अभ्यासकांचा आवाज ऑनलाइन शिक्षणाच्या प्रचंड कोलाहलात क्षीण होत गेला. कोरोनाआधी काही कुटुंबामध्ये लहान मुलांना नादी लावताना, जोजावताना हातात मोबाइल दिले जात. दूरचित्रवाणीवरील कार्टून शो दाखवले जात. आताच्या तुलनेत ही संख्या अगदीच नगण्य होती. कोरोनाच्या साथीसोबत आलेल्या ऑनलाइन शिक्षणाच्या ‘साथी’मुळं ऐपत असलेल्या घरांमध्ये मोबाइल असणं हा जणू मुलांचा हक्क म्हणून प्रस्थापित झाला! मार्केट याच गोष्टीच्या प्रतीक्षेत होतं. मोबाइलवरील गेम, अॅप्स आणि सोशल साइट्सचं डिझाइन लहान मुलांना नजरेसमोर ठेवून केलं गेलंय. मुलं स्क्रीनवर खिळून राहिली पाहिजेत, अशी एकूण रचना आहे. डिजिटल कंपन्यांनी रचलेल्या पद्धतशीर सापळ्यात आपली मुलं अलगद अडकली आहेत, हे वास्तव कसं नाकारता येईल? गतीनं आणि सफाईदारपणानं मोबाइल हाताळणाऱ्या मुलांचं पालकांना अप्रूप आणि अफाट कौतुक असतं. असो!
ग्रामीण पालक कामांत गुंतलेले असतात. मोबाइलची जुजबी माहिती असलेल्या पालकांना सुरक्षितता म्हणून करावयाचे उपाय माहिती असायचं कारण नाही. मोबाइल कामापुरता वापरायचा असतो, याचं भान हळूहळू सुटत गेलं. मनमानी सर्फिंग सुरू झालं. एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळं मुलं सैराट झाल्यासारखी वागू लागली. तासनतास वेळ बरबाद करणारे इंटरनेट-गेमिंग असो की वर्तन समस्या वाढवणारी हिंसक दृश्ये सातत्यानं बघणं असो. नाकळत्या वयात मनावर येऊन आदळणाऱ्या, बिथरवणाऱ्या असंख्य पॉर्नोग्राफीच्या साइट्स असोत की सायबर गुन्हे करून बसणं असो. असं घडलंय, घडतंय. कायदे आणि धोक्यांबाबत अजिबात जाणीवजागृती नसलेल्या आपल्या समाजात मुलांच्या हाती मोबाइल आलेत. दिल्लीतल्या गर्भश्रीमंत मुलांच्या ‘बॉइज लॉकर रूम’ची चर्चा उजेडात आली आणि विरून गेली. विकृत लैंगिक आकर्षणातून शंभर मुलींचे व्हॉटसअॅप अकाउंट हॅक करून मुलांनी अश्लिल संदेश पाठवले. व्हॉटसअॅप ग्रुपमधून मोबाइल नंबर मिळाल्यानं मुलींचे लैंगिक छळ वाढलेत. भारतात पॉर्नोग्राफीच्या साइट्सवरचं ट्राफिक मोठ्या प्रमाणात वाढलंय. राज्यातल्या एका शहरात क्लासमधल्या मुलांनी तरुण शिक्षिकेच्या शरीराच्या विशिष्ट भागांचे स्क्रिनशॉट्स घेऊन ते व्हॉटसअॅप ग्रुपमधून व्हायरल केले. त्यावर अश्लिल शेरेबाजी केल्याचं प्रकरण ताजं आहे.(यात केवळ मुलग्यांना दोष द्यायचा हेतू नसून, मुलग्यांच्या पुढाकारातून घडलेली नमुनेदार उदाहरणं समोर ठेवत आहे.) प्रचंड आर्थिक विषमता असलेल्या आणि शिक्षणात माहिती तंत्रज्ञानाच्या वापराला न सरावलेल्या भारतासारख्या देशात ‘ऑनलाइन शिक्षण’ हा स्वतंत्र चर्चेचा, लेखाचा विषय आहे. ऑनलाइन शिक्षणाला असंख्य मर्यादा आहेत. सध्या सुरू आहे ही केवळ तात्पुरती मलमपट्टी आहे. मुख्य प्रवाहातल्या शिक्षणाला हा कधीही पर्याय ठरू शकत नाही. शाळा-महाविद्यालयं पुन्हा सुरू होतील, तेव्हा खरं औपचारिक शिक्षण सुरू होईल, हे सरकारनं स्पष्ट केल्यास डिजिटल परिघाबाहेरील मुलांना आपला अभ्यास बुडतोय, शैक्षणिक नुकसान होतंय, याची सल बोचणार नाही. शिवाय मोबाइलवरून पालकांचं जे भावनिक ब्लॅकमेलिंग सुरू आहे ते थांबायलाही मदत होईल.
सध्या व्हॉटसअॅपवर टाइप करण्याऐवजी मुलं व्हाइस टायपिंग करून ऑडीओ फाइल पाठवताय. आनंद-दु:ख अशा मनातल्या भावना व्यक्त करायला भाषेऐवजी इमोजी-स्टिकर्स वापरताय. लिहायचं सोडून थेट कॉल करण्यावर मुलांचा भर आहे. या सगळ्याचे भाषिक विकासाबरोबर भावनिक वाढीवर वाईट परिणाम संभवतात. लहान लहान मुलं तहान-भूक आणि स्वत:ला विसरुन तासनतास मोबाइलवर असतात. आईवडलांनी तो काढून घेतल्यास अत्यंत हिसंक प्रतिक्रिया देतात, आदळआपट करतात. स्वत:ला त्रास करून घेतात. प्रसंगी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतात. अनेक मुलं चिडखोर, बंडखोर, भांडखोर बनलीत. त्यांची झोप हरवलीय. रात्री जागतात, उशिरा उठतात, जैविक घड्याळ बिघडलंय. मन चंचल बनलंय. तास-दीडतास लक्ष केंद्रित होत नाहीए. नको त्या गोष्टी आदळल्यानं मनात गोंधळाचा गुणाकार होत जातोय. सगळं ठीक चाललेलं असलं तरी अनेक मुलं उदास भासतात. आनंदी वृत्तीचा निर्देशांक घसरल्याचं चित्र अस्वस्थ करतं. मोबाइलवरचं अवलंबित्व वाढत जाणं, प्रत्यक्ष माणसांशी संवाद कमी होणं किंबहुना तो थांबलेला असणं आणि आयुष्यातून खेळ आणि छंदांचं वजा होणं भयंकर जीवघेणं आहे. यामुळं मुलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याचं झालेलं नुकसान कोणत्याच एककात मोजता येणार नाही. एखाद्या व्यसनाच्या गर्तेत हातपाय खोल रुतलेल्या व्यसनी व्यक्तीला त्यातून बाहेर काढणं जसं अशक्य कोटीतलं आव्हानात्मक काम होऊन बसतं, तसंच होण्याची शक्यता निर्माण झालीय. अभ्यासाला म्हणून अगदी आनंदानं सहज मुलांच्या हातात दिलेला मोबाइल तितक्या सहजपणानं पुन्हा घेता येणार नसल्याची पालकांची खात्री पटली आहे. पुण्यातल्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात मोबाइल आणि गेमिंग अॅडीक्शन असलेल्या लोकांसाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण केली गेलीय. तिकडं अॅडीक्शनवाल्यांची वाढती संख्या घोर लावणारी शोकांतिका बनली आहे. ऐन उमेदीच्या वयात मोबाइलच्या अतिआहारी गेलेल्या मुलांचे डोळे खराब झालेत, होताय. संवेदनशील मनाचे पाझर आटत चाललेत. मेंदू बधीर होत चाललेत. मेंदूमधल्या 'ग्रे मॅटर'वर परिणाम होऊन निर्णयक्षमतेचा क्षय होत असल्याचं अभ्यासातून समोर आलंय. इतके दूरगामी दुष्परिणाम बघता आपल्याकडं मोबाइल नाही, याचं वंचित मुलांनी वाईट वाटून घेण्याचं काहीच कारण नाहीए.
मोबाइल/गॅझेटस् म्हणजे मुलांचे शत्रूच आहेत, असं चित्र उभं करायचं नसून, प्रश्न मुलांवर नियंत्रण कसं ठेवायचं आहे. सध्या कोरोना रोगापेक्षा ऑनलाइन शिक्षणाचा इलाज जास्त भयंकर होऊ बघतो आहे, याची चर्चा व्हायला हवी. शालेय मुलांच्या, युवकांच्या वर्तन समस्या काळजीत टाकणाऱ्या आहेत. ग्रामीण आणि शहरी यातल्या सीमारेषा आता धूसर होऊ लागल्यात. या सगळ्याचे मुलांवर कोणकोणते गंभीर परिणाम संभवतात, यामागील कारणांचा शोध घेऊन तातडीनं उपाययोजना करायची हीच वेळ आहे. अन्यथा काळ आपल्या हातातून निसटून जाईल. गिनीपिग बनवलेली आपली मुलं त्रासतील. भविष्यात शिक्षणासह सर्वच क्षेत्रांत माहिती तंत्रज्ञानाचं महत्त्व वाढत जाणार हे स्पष्ट आहे. एका आकडेवारीनुसार भारतातली साडेसहा कोटी मुलं रोज ऑनलाइन येतात. इयत्ता पहिली ते उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तीस कोटींहून अधिक आहे. या मुलांना आतापासून आयुष्यभर ग्राहक बनवण्यासाठी गुगलपासून जगभरातल्या या क्षेत्रातल्या बड्या कंपन्या सरकारी धोरणांवर प्रभाव-दबाव टाकून आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरणात(२०२०) ऑनलाइन शिक्षणाला दारं खुली करण्यात आलीय, हेही इथं विशेष उल्लेखनीय आहे. डेटा आणि अल्गोरिदमच्या इंधनावर चालणाऱ्या आजच्या डिजिटल जगात प्रचंड डेटा हाती आल्यानं डिजिटल मार्केट नक्की तेजीत येईल. शेअर बाजारात कंपन्यांचा निर्देशांक उंच जाईल. मात्र देशाचं भविष्य असलेल्या मुलांच्या आयुष्यात त्यामुळं मोठी ‘मानसिक, भावनिक मंदी’ येऊ घातलीय, सावध होऊन काळाच्या हाका ऐकणार का? हाच खरा प्रश्न आहे.
_______________________
मोबाइल - 9422855151.
Email -
bhauchaskar@gmail.com
_________________________
( _लेखक नगर जिल्हा परिषदेच्या वीरगाव येथील शाळेत शिक्षक असून, अॅक्टीव्ह टीचर्स फोरमचे ते संयोजक आहेत._ )
_________________________
लेख शेअर, फॉरवर्ड करू शकता.
x